रासायनिक व सेंद्रीय खताचा अवैधरित्या साठा व विक्री केल्याप्रकरणी कुणकेश्वर कातवणेश्वर येथील कृषी सेवा केंद्र मालक राहूल राजेश जोईल(२४) या संशयिताविरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित राहूल जोईल याच्याकडे ३ लाख ३१ हजार ३०० रूपये रकमेचा कृषी उत्पादनांचा विनापरवाना अवैध खत साठा आढळून आला.ही कारवाई ३० मे रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक सिंधुदुर्गचे सुशांत व्यकंटराव भोसले यांनी केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग ओरस या कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक सुशांत भोसले हे ३० मे रोजी दुपारी १२ वा.सुमारास देवगड तालुक्यातील कुणकेश्वर कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषी सेवा केंद्र या निविष्ठा विक्री केंद्राची नियमित तपासणी करीत होते.यावेळी या केंद्रानजिक कृषी सेवा केंद्र मालक राहूल जोईल हा संशयित सुखकर्ता कृषी सेवा केंद्राच्या समोरील शेत मांगरात अवैधरित्या रासायनिक व सेंद्रीय खताचा साठा व विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले.संशयिताजवळ विचारणा केली असता खतविक्री करीता आवश्यक परवाना संशयिताकडे नसल्याचे उघड झाले.त्यानंतर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक सुशांत भोसले यांनी देवगड पोलिसांच्या मदतीने शेतमांगराची तपासणी केली यावेळी शेतमांगरामध्ये ५० किलो वजनाचे व प्रत्येकी ९७५ रूपये किमतींचा १५६ बॅग अशी एकूण १ लाख ५२ हजार १०० रूपयांची कृषी उत्पादने तसेच २५ किलो वजनाचे व प्रत्येकी ३२०० रूपये किमतींचे ५६ बॅग अशी एकूण १ लाख ७९ हजार २०० रूपयांच्या अवैध कृषी उत्पादनाचा साठा आढळून आला.
अवैध कृषी उत्पादनांचा हा अवैध साठा एकूण ३ लाख ३१ हजार ३०० रूपयांचा असून या घटनेचा पंचनामा देवगड पंचायत समिती कृषी अधिकारी डी.एस्.खराडे व देवगड पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई यांनी केला.या घटनेची फिर्याद जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक सुशांत भोसले यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून फिर्यादीनुसार संशयित राहूल जोईल याच्याविरूध्द खत नियंत्रण आदेश १९८५ चे कलम ७, ३५ व अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ (२) (अे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई करीत आहेत.
