घर मालक गेले होते मुंबईला, सीसीटीव्ही बंद झाल्याचे निदर्शनास आल्यावर केली चौकशी
कुडाळ | प्रतिनिधी
घराच्या सुरक्षितेसाठी लावलेले सीसीटीव्ही बंद का झाले हे पाहण्यासाठी विनोद रुद्रे यांनी आपल्या भावाला घराजवळ पाठवले त्यावेळी निदर्शनास आले की त्यांच्या घरामध्ये चोरी झाली. या चोरीमध्ये तब्बल रोख रक्कम १ लाख ८० हजार सह ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १ हजार रुपयांची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली. ही घटना कुडाळ नाबरवाडी येथे घडली. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांड करीत आहेत.
नाबरवाडी येथील विनोद रुद्रे हे आपल्या मुलाजवळ मंगळवार ३ जून रोजी मुंबई येथे गेले होते. त्यांच्या घराच्या सभोवताली सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. दरम्यान ते मुंबईमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. हे सीसीटीव्ही का बंद आहेत? याची चौकशी करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला त्यांच्या बंद असलेल्या घरी पाठविले. त्यांच्या भावाने बघितले तर घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील असलेली कपाटे फोडलेली आहेत. तसेच सामान अस्ताव्यस्त टाकलेले आहे. ही माहिती विनोद रुद्रे यांना दिल्यानंतर ते तात्काळ कुडाळ मध्ये आले त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेली घटना सांगितली.
२ लाख ११ हजार रुपये किमतीची झाली चोरी
मुंबईवरून विनोद रुद्रे आल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली यामध्ये त्यांनी सांगितले की घरातील कपाटांमधील रोख रक्कम १ लाख ८० हजार, ४० हजार रुपये किमतीची एक सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सीसीटीव्हीसाठी लागणारा १ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर मशीन चोरीला गेला आहेत. त्यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वान पथक नेरुर रस्त्यावर घुटमळले
ही चोरी झाल्यानंतर ठसे तज्ञ तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. हे श्वान पथक घरापासून ४०० मीटर अंतरावर नेरूर रस्त्याला जाऊन घुटमळले. त्यामुळे पुढचा मार्ग पोलिसांना सापडू शकला नाही. घटनास्थळी पोलीस उपधिक्षक आढाव तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, तपासी पोलीस अधिकारी भांड दयानंद चव्हाण यांनी भेट दिली.
