सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
गेली कित्येक वर्षे कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या तर अवैध वाळू काढण्यात शासनाची बंदी असताना ऐन जुलै महिन्यांत या कोरजाई खाडीत आठ बोटी खाडीत खालून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे. तसेच याठिकाणी पाच रॅम्प असून, वेंगुर्ले तहसीलदार या वाळूच्या रॅम्पवर नविन कायद्यानुसार रॅम्प मालकावर कारवाई करणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
काही दिवसांपुर्वी पावसाळी अधिवेशनात या कोरजाई खाडीत अवैध वाळू काढली जात असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरजाई खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू काढण्याऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश सभागृहात दिला होता. मात्र या आदेशाची वाळू व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्याचबरोबर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुरू असलेल्या अनधिकृत वाळु बाबत कळविले असता जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला असल्याचे बोलले जात आहेत.
याबाबत निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना विचारले असता त्यांनी म्हटले की या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर वेळोवेळी आम्ही कारवाई करून हे डंपर महसूल विभागाच्या ताब्यात दिले आहेत पुढील कारवाई महसूल विभागाने करायचे आहे तसेच खाडीपात्रात वाळू उत्खनन होत असताना त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू शकत नाही पण अवैध वाळू वाहतूक होत असताना आम्ही कारवाई करीत आहोत असे त्यांनी सांगितले.


