देवगड | प्रतिनिधी
वरेरी कुळये येथील चिरेखाणीमध्ये काम करणाऱ्या दोघा भावांमध्ये भांडण होऊन एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोकीवर व्हीलपाना मारला यामध्ये कामगार कृष्णकुमार यादव याचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ रितिक यादव यांच्याविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे. या चिरेखाणीवर सुमारे ८ ते १० परप्रांतीय कामगार कामास आहेत. यात नात्याने चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही भाऊ चिरेखाणीवरील एका ट्रकमध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित रितीक याचा सिगारेट ओढण्याचा लाईटर कृष्णकुमार याच्याजवळ होता. रितीक याने त्याच्याजवळ लाईटरची मागणी केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. कृष्णकुमार याने रागाच्या भरात रितीक याच्या कानशीलात लगावली व तो ट्रकबाहेर निघून आला. मात्र हा राग मनात ठेवून संशयित रितीक याने ट्रकमधील व्हीलपाना घेत कृष्णकुमार याचा मागून चिरेखाणीपर्यंत गेला व संशयितांनी कृष्णकुमार याच्या डोक्यात व्हील पान्याने जोरदार प्रहार केला. हा वार वर्मी लागल्याने कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी व्हील पाना चिरेखाणीतील पाण्यात फेकून देत तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान तळेबाजार येथे राहणारा चिरेखाणीचा मुकादम विजय अण्णापा शेंडगे हा बुधवारी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे तो चिरेखाणीवर गेला यावेळी त्याला कृष्णकुमार व रितीक हे दिसले नाहीत. त्यामुळे त्याने इतर कामगारांसमवेत त्या दोघांचा चिरेखाण परिसरात शोध घेतला. यावेळी कृष्णकुमार हा चिरेखाणीत मृत अवस्थेत दिसून आला. तर त्याचा चुलतभाऊ रितिक हा घटनास्थळी दिसून न आल्याने मुकादम व कामगारांनी रितीक याचा शोध घेतला. रितीक हा तळेबाजार बाजारपेठ येथे दिसून आल्यानंतर मुकादम शेंडगे याने त्याला आपल्या सोबत ठेवले व तात्काळ या घटनेची माहिती त्याने पोलिस पाटील मुकेश पारकर यांना फोनवरून दिली. पोलिस पाटील पारकर यांनी या घटनेची माहिती देवगड पोलिस स्थानकात दिल्यानंतर देवगड पोलिस निरिक्षक भरत धुमाळ हे आपल्या सहकारी कर्मचायांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित रितीक याला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.
घटनास्थळी तपासकार्यात पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, आशिष कदम, भाऊ नाटेकर, पो.कॉ.प्रसाद आचरेकर, दिपेश तांबे, रविंद्र महाले, राजेश पाटील यांनी काम पाहिले. यावेळी वरेरी सरपंच सौ.प्रिया गोलतकर, पोलिस पाटील मूकेश पारकर, चिरेखाण मालक उमेश गवाणकर उपस्थित होते. घटनेची फिर्याद मुकादम विजय अण्णापा शेंडगे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून संशयित रितीक यादव याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरिक्षक भरत धुमाळ करीत आहेत. अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट देवून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.


