कुडाळ | प्रतिनिधी
तालुक्यातील मांडकुली येथील जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सुमारे ११ हजार ७०० रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मुख्याध्यापक सुयोग धामापूरकर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडकुली येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. शनिवारी शाळा बंद करून गेल्यानंतर आज (सोमवारी) सकाळी शाळा उघडल्यानंतर शाळेच्या एका खोलीचे दरवाजे कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. मुख्याध्यापक सुयोग धामापूरकर यांनी पाहणी केली असता या खोलीमधील कलर प्रिंटर, पितळीची समई, माईक, साऊंड मशीन, भिंतीवरील घड्याळ असे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून सुमारे ११ हजार ७०० रुपयांची चोरी झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी ठसे तज्ञांनी तपासणी केली.


