असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला
राज्याच्या राजकारणात गेल्या साडे चार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या, आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या, कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा, ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेली नाळ, स्वत:साठी राजकीय विद्यापीठ करून घेताना दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.
कुटुंबीयांकडून अजितदादांचे अत्यंदर्शन
आज अजित पवार यांचे पार्थिव सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या जमावाला अश्रु अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा रोखणं अशक्य झालं होतं. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांनी मुळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले.
अजित पवारांना राजकीय दिग्गजांकडून श्रद्धांजली
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रफुल पटेल, रितेश देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने, अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण वाहिली.
पोलिसांकडून अजितदादांना मानवंदना
अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्यात आल्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांनी पार्थिवाला मंत्राग्नि दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादा अमर रहेच्या गगनभेदी घोषणा देताच विद्या प्रतिष्ठानचा प्रत्येक कोपरा अन् कोपरा हळहळून गेला.


