गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना सूचना
कुडाळ | प्रतिनिधी
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासन ऑन फिल्ड उतरले असून रस्त्यालगत असलेले स्टॉल व दुकानांचे बॅनर काढण्याचे सक्त आदेश प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिले आहेत.
गणेश चतुर्थी सणामध्ये कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी कुडाळ शहरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना यांची बैठक प्रशासनाने घेतली होती या बैठकीच्या अनुषंगाने प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्यासह तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, कुडाळ नगरपंचायतीचे संदीप कोरगावकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उसाळे आदी अधिकारी, कर्मचारी यांनी ऑन फिल्ड काम सुरू केले आहे.
प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्यासह अधिकाऱ्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते गणेश नगर पर्यंत रस्त्यालगत असलेले व्यावसायिकांचे फलक तसेच स्टॉल काढण्यासंदर्भात सूचना केल्या या पूर्ण रस्त्यावर अधिकार्यांनी फिरून संबंधित व्यावसायिकांना सूचना केल्या या सूचनांचे पालन न झाल्यास कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले गणेश चतुर्थी मध्ये मुख्य रस्ता हा मोकळा असला पाहिजे आणि वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे यासाठी ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला व्यवसायिकांनी सुद्धा प्रतिसाद दिला.
