Monday, August 24, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा यूज्ड कार डीलर्स संघटनेची स्थापना

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा यूज्ड कार डीलर्स संघटनेची स्थापना

कुडाळ, 23 ऑगस्ट 2026 :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या डीलर्सना एकत्र आणून त्यांच्या व्यावसायिक समस्या सोडवणे, परस्परांमध्ये संपर्क, विश्वास व समन्वय वाढवणे तसेच डीलर्सच्या सामूहिक हितासाठी संघटितपणे काम करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यूज्ड कार डीलर्सची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे पार पडली.

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने यूज्ड कार डीलर्स सहभागी झाले होते. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व डीलर्सनी आपापला परिचय करून देत परस्परांमध्ये संपर्क, विश्वास आणि सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली.

वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी, कागदपत्रांची पूर्तता, ग्राहक व विक्रेता यांच्यातील व्यवहार तसेच इतर व्यावसायिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः आरटीओ कार्यालयातील वाहन मालकी हस्तांतरण (Ownership Transfer) प्रक्रियेदरम्यान डीलर्सना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर संघटनेच्या माध्यमातून एकत्रितपणे मांडण्याचे ठरविण्यात आले.

डीलर्सच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि सर्व डीलर्सचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा यूज्ड कार डीलर्सची संघटना स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून सर्व सदस्यांमध्ये नियमित संपर्क ठेवणे, महत्त्वाची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणे, अडचणीच्या काळात परस्परांना सहकार्य करणे तसेच डीलर्सच्या सामूहिक हितासाठी आवश्यक निर्णय घेण्याबाबतही चर्चा झाली.

यापुढे संघटनेच्या माध्यमातून नियमित बैठका घेऊन आरटीओशी संबंधित विषय, व्यवसायातील बदल, नवीन समस्या आणि डीलर्सच्या सूचना यावर चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले.

या बैठकीस कोल्हापूर कार डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी श्री. सुधाकर सासणे, श्री. महेश संकपाळ, श्री. शीतल दत्तवाडे, श्री. एजाज नागरगट्टी आणि श्री. अमर माळवे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित डीलर्सना मार्गदर्शन करून संघटितपणे काम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

 

सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा यूज्ड कार डीलर्स संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी श्री. बलवंत कुडतरकर, उपाध्यक्षपदी श्री. सुरज सुभाष प्रभू, सचिवपदी श्री. अमोल जाधव, खजिनदारपदी श्री. राहुल नाडकर्णी आणि कार्याध्यक्ष पदी श्री. सतीश मांजरेकर यांची निवड करण्यात आली.

या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून श्री. नंदू आंबेरकर, श्री. संजय वाघमोडे, श्री. बाबल गावडे, श्री. संजय कांबळी, श्री. विवेक अणावकर, श्री. अतुल शेट्ये, श्री. योगेश साटेलकर, श्री. हमीद खान बिजली,श्री. रूपेश तांडेल, श्री. मोसिन खान, श्री. कृष्णा कुंभार, श्री. राजू कवठणकर, श्री. सुभाष येरम, श्री. दत्ता माईणकर सर,यांच्यासह अनेक यूज्ड कार डीलर्स उपस्थित होते.

शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, डीलर्स आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यूज्ड कार डीलर्सना एका छताखाली आणून त्यांच्या व्यावसायिक हितासाठी संघटितपणे काम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!