Thursday, September 10, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीजिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाने खोट्या अफवा पसरवू नयेत!

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाने खोट्या अफवा पसरवू नयेत!

हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करा!

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आणि अफवा प्रसारित केल्या जात आहेत. मात्र,या दाव्यात कोणतेही तथ्य नसून डॉ. श्रीपाद पाटील यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिलेला आहे. असे प्रसिद्धी पत्रकात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख स्वरूप वाळके यांनी म्हटले आहे.

उबाठा गटाकडून जर या राजीनाम्याबाबत एवढेच खात्रीशीर दावे केले जात असतील, तर हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करावी! केवळ राजकीय हेतूने अर्धवट माहितीच्या आधारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

अनधिकृत बांधकामावरील झालेली कारवाई ही अचानक किंवा कोणाच्या दबावामुळे झालेली नसून, अनेक महिन्यांपासून प्रस्तावित असलेली कारवाई आहे. संबंधित सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच शासनाकडून नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कारवाईचा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्याशी संबंध जोडणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांनी प्रथम जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्याबाबत नीट माहिती घ्यावी आणि त्यानंतरच आरोप करावेत. वस्तुस्थिती अशी आहे की, डॉ. श्रीपाद पाटील अजूनही जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असून जिल्हा रुग्णालयात आपली सेवा देत राहणार आहेत.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या जागेत अनधिकृत हॉटेल उभारून दरमहा ४० हजार रुपये भाडे वसूल करून स्वतःचे खिसे भरणाऱ्यांचे प्रकार आरोग्य विभागाच्या कारवाईमुळे उघड्यावर आले आहेत. त्यामुळे कारवाईनंतर निर्माण झालेल्या नैराश्यातूनच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्याबाबत अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

कारवाई कायदेशीर प्रक्रियेतून झाली आहे; राजीनामा व्यक्तिगत कारणास्तव झाला आहे. त्यामुळे खोट्या अफवा आणि राजकीय अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न उबाठा गटाने थांबवावा असे युवा सेना जिल्हा प्रमुख स्वरूप वाळके यांनी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!