कुडाळ | प्रतिनिधी
मी या जिल्ह्यामध्ये १९९० पासून कार्यरत आहे तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याच जोमाने माझ्या दोन्ही मुलांच्या मागे उभे राहिलात त्यामुळे आम्हाला आमदार ते मंत्री ही पदे भूषवता आली यापुढे तुमच्यासाठी सतत कार्यरत आम्ही राहणार आहोत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी पावशी येथे आयोजित केलेल्या कॅबिनेट मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या सत्कार कार्यक्रमाविषयी केले यावेळी राणे कुटुंबीयांनी जनतेचे व मतदारांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून त्यांचे स्वागत व सत्कार ठिकठिकाणी होत असताना कुडाळ व मालवण मतदार संघाच्या वतीने पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभामध्ये मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सौ. नीलमताई राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश सारंग, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपचे राजू राऊळ, पावशी सरपंच वैशाली पावसकर तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी सांगितले की, ९० सालापासून या जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. मधला काळ आमच्यासाठी खूप कठीण गेला. पण पराभवाची चर्चा करण्यापेक्षा मिळालेल्या विजयाची उजळणी करावी असे सांगून आमदार नितेश राणे यांनी हॅट्रिक केली तर आमदार निलेश राणे यांनी सुरुवात केली. पण ही सुरुवात करत असताना त्यांनी दोघांनीही परिश्रम घेतले. पण खरे यश हे कार्यकर्त्यांचे आहे. गेल्या दहा वर्षात हेच कार्यकर्ते आमच्या सोबत होते. आणि आजही आहेत तुम्ही आहात म्हणून आम्हाला ही पदे मिळत आहेत. तुम्ही सदैव असेच आमच्या पाठीशी उभे राहा आणि आमच्याकडून काम करून घेत राहा. आता आम्ही फक्त या जिल्ह्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम करत राहणार असे सांगून या यशामध्ये माझी पत्नी सौ नीलम राणे हिचे सुद्धा श्रेय आहे मी कोणत्या शब्दात आभार मानू हे मला सुचत नाही. यापुढे निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या पाठीशी तुम्ही असेच खंबीरपणे उभे राहा अशी भावनिक साधही खासदार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना देऊन सर्व मतदारांचे आभार मानले.
आपल्या हुशारीचा फायदा नितेशने केला
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, मंत्री नितेश राणे हे म्हणण्याची सवय आता आम्हाला लावली पाहिजे नितेश राणे माझा लहान भाऊ असला तरी तो माझा खरा मित्र आहे. तो लहान असल्यापासूनच हुशार आहे तसा तो साधा सुद्धा आहे. त्याने आपल्यामध्ये बरेच बदल घडवले आहेत. सतत काम करत राहणे हा त्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे त्याला हे यश प्राप्त झाले आहे. देव कोणालाही देताना सुद्धा विचार करून देतो. नितेश राणे यांना मंत्री देण्यामागे देवाचा काहीतरी उद्देश असणारच, त्याच्यासारखा भाऊ मिळणे हे नशीब लागतं. नितेश राणे याचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. फार लोकांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखविले. यामागे राणे फॅक्टरी लागते असे सांगून त्याचा मला सार्थ अभिमान आहे. राणे साहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये जे खाते मिळाले होते तेच खाते नितेश राणे यांना मिळाले आहे ते कणकवली मधून जिंकून आले होते. नितेश राणे सुद्धा कणकवली मधून जिंकून आले हा नियतीचा खेळ आहे की, आता पुन्हा एकदा राणे कुटुंबीय जिंकून आले आहेत आणि सत्तेत आहेत २०१४ पासूनचा काळ हा आमच्यासाठी कठीण गेला. पण आता या जनतेची फक्त सेवा करायची आहे. पुन्हा एकदा नवा सिंधुदुर्ग बनवायचा आहे. यासाठी मंत्री नितेश राणे यांना जे सहकार्य लागेल ते आम्ही १०० टक्के देऊ. जसा तुम्ही जो आमच्यावर आशीर्वाद ठेवला आता आमची जबाबदारी वाढली आहे असे त्यांनी सांगितले.
आता अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा येईल
यावेळी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, आता खरी गंमत आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन बैठकीमध्ये तीन राणे आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर हे असणार आहेत. महायुतीचे हे सर्व लोकप्रतिनिधी असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा येणार आहे. कारण आता आम्ही थांबणार नाही. काम ही झाली पाहिजे खासदार नारायण राणे यांनी त्या काळात जो जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत ठेवला होता त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहणार आहोत. कारण आता आपल्याला भक्कम असे आमदार, खासदार मिळाले आहेत. २०१४ ते २०२४ पर्यंत कुडाळ विधानसभेचा आवाज विधानसभेत ऐकायला येत नव्हता. पण आता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पहिल्या अधिवेशनात त्यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. अनेक मंत्री, अनेक आमदार यांनी माझ्याजवळ त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आणि हे ऐकताना मला सुद्धा समाधान वाटले त्यांच्या या प्रश्न मांडण्याच्या आणि सरकारला त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मजबूर करणे हे कौतुकास्पद आहे. यापुढे निश्चित या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत राहतील. सिंधुदुर्ग जिल्हा ज्या स्तरावर होता त्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही दाखवलेला विश्वास कुठेही कमी पडू देणार नाही. तुम्ही एक आमदार दिलात त्यात तुम्हाला फ्री मंत्री मिळाला. त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. या मतदार संघाचे सुप्रीम कोर्ट हे निलेश राणे असतील ते या मतदारसंघात सांगतील ती कामे होतील. असे सांगून आमदार निलेश राणे यांच्या यशामागे आमच्या आईसाहेब यांचा मोठा हातभार आहे. शेवटच्या क्षणाला त्यांनी जी चावी फिरवली त्यांनी सगळं काही बदलून गेलं असेही त्यांनी यावेळी सांगितले.
