इंडिया आघाडीत बिघाडी?

0

‘आम आदमी’ने जाहीर केला महाराष्ट्रात उमेदवार

 

मुंबई | प्रतिनिधी 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका गांभिर्याने घेतल्या असून राज्यातील सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली आहे.

येत्या काही दिवसांतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि मनसेनेही निवडणुकीच्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही मागे नाही. त्यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुका गांभिर्याने घेतल्या असून आता राज्यात परभणीतून सतीश चकोर यांच्या रुपाने तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. 

दरम्यान राज्यातील सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली असून, आतापर्यंत त्यांनी बीड आणि लातूरमध्येही उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तर ते दुसरीकडे एक एक उमेदवार जाहीर करत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीतच बिघाडी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा भाग होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मुंबईत येऊन प्रचारही केला होता