मागील आर्थिक वर्षात 26 हजार 128 नवीन ग्राहकांना वीज जोडणी

 

*रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा*

 

रत्नागिरी / सिंधुदुर्ग,

दिनांक 14 मे 2025 

‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक इतर अशा विविध वर्गवारीतील 26 हजार 128 वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात (सन 2024-25) नवीन वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 16 हजार 551 ग्राहकांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 हजार 577 ग्राहकांचा समावेश आहे.

 नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेले निर्देश आणि वीज नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.

 गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात 13 हजार 12 घरगुती ग्राहकांना, 2 हजार 178 वाणिज्य ग्राहकांना, 210 औद्योगिक ग्राहकांना व 1 हजार 151 इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणच्या तीन विभागांपैकी रत्नागिरी विभागात सर्वाधिक 7 हजार 696 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 हजार 342 घरगुती ग्राहकांना 1 हजार 146 वाणिज्य ग्राहकांना, 124 औद्योगिक ग्राहकांना व 965 इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या दोन विभागांपैकी कणकवली विभागात सर्वाधिक 5 हजार 01 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

 आज ग्राहकांना घरी बसल्या, संकेतस्थळ व मोबाईल अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने वीज जोडणीचा अर्ज सादर करता येतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

 सध्या, महावितरण ‘कृती मानके’ नुसार जिथे वीज यंत्रणा नव्याने उभी करण्याची आवश्यकता नाही अशा शहरी भागात सात दिवसांत तर ग्रामीण भागात पंधरा दिवसांच्या आत वीज जोडणी देण्यात येते. ग्राहकांना नवीन जोडणी बाबत अधिक माहिती हवी असल्यास ते नजीकच्या महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात.